A Little Happiness (Photo credit: Wikipedia) |
इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत
स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या
कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत
आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..
आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं
उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत...
तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास
झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा... सतरा भुंगे एकत्र
नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं
काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक
अट्टाहास बघून...
काय बरं सांगत होते मी... पाहिलं, हे असं करतंय मन... आता इथे तर लगेच
कुठे भलतीकडेच... किंवा गायबच अचानक... एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय
जाऊन... ढोंगी... आगाऊ... आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव
भांड्यात पडेल... काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा..
स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न??
नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग
कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो
त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं??
भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी...
मळभ आलं होतं म्हणून?... हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी
आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं
चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित
‘असणंच’ चुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा
उमाळा येतोय... काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू
शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..
तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं..
रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय
करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं...आणि पाऊस कोसळायला
लागतो, झिम्माड... आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज
गालातल्या गालात हसतो हलकेच...आणि हळुवारपणे म्हणतो..."काही नाही...तुला
सुख दुखतंय...!!!
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
OK
उत्तर द्याहटवाKhupach chan
उत्तर द्याहटवाKhupach chan ahe hhe manache vividh pailu ahet.
उत्तर द्याहटवा