तूच सांग या वेड्या मनाला

पापण्यांचे पंख लावून आज
उडू पहातंय पाखरू ,
तूच सांग ,या वेड्या मनाला ,
आता कसं आवरू?

खूप समजावलं त्याला ,
अरे,क्षितीज असतं फसवं ,
गवसल्यासारख वाटतं ,तिथेच,
शोध होतो पुन्हा सुरु ........

इंद्रधनुचे सप्तरंग ,
आपल्यासाठी नसतात रे ,
सगळ हरपून बघ ,पण ,
त्याची आस मात्र नको धरू ........

आकाशीचे चंद्र -तारे ,
फक्त अंधाराचेच सोबती ,
त्या आभासाच्या मागे तू ,
नको रे गरगर फिरू.......

रहाता राहिला सूर्य ,अरे,
तो तर आपला कधीच नसतो ,
जवळ त्याच्या जाण्याचा तर ,
विचारसुद्धा नको करू..... ...

एकूण काय ,आभाळ नसतं आपल्यासाठी ......
आपली स्वप्न जमिनीवरची ,
उडण्याच्या या हट्टापायी
त्यांनाच नको विसरू............

मग ते म्हणालं ,
एकदाच मला उडू दे......
पंखांची ताकद आजमावूदे ,
वाळूतली मृगजळसुद्धा ,
उडता -उडता पाहूदे....

फार तर काय होईल ?
पापण्यांचे पंख अश्रूंनी भिजतील .....
पण माझा प्रयत्न सच्चा होता ,
याचं समाधान तरी राहील ........

शेवटी मग मीही म्हटलं ,उडू दे बापड ,
आज त्याचाही हट्ट पुरा करू ,
सरळ बळ पंखातलं तर ................
आपणच एकमेकांना सावरू ................................

- माधुरी .......

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. Aaushyat sagle anubhav gheun pahavet,
    Jinklo tari apalach ani harlo tari apalach

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा