Image by Getty Images via Daylife
वर्दी नवीशी ल्यायली, राजू लढाया चाललादेशापुढे संसार त्याला एवढासा वाटला
सैनीक पेशा घ्यायला कोणी घरी राजी नसे
पण आज त्याला पाहुनी प्रत्येकजण भारावला
लग्नास केवळ दोन वर्षे जाहली होती तरी
तो चालला या भारताच्या कारगिल सीमेवरी
हिरवा कडक पोषाख अन जेतेपणा नजरेतही
पिस्तूल पट्ट्याला, करारी केन तो हाती धरी
आई रडायाची मुळी थांबेचना पाहून ते
बाबा म्हणे "जाऊ नको, ही नोकरी सोडून दे"
पत्नी रडे, राजूपुढे येणे न होई शक्यही
राजू म्हणे "मी भारताला युद्ध हे जिंकून दे"
ना ऐकतो पाहून तोही हात त्यांनी टेकले
शेजारचा येई म्हणे "हे भाग्य कोणा लाभले? "
जो पुत्र मातेला स्वतःच्या रक्षतो तो पुत्र हो
गल्लीतले सारे म्हणे की नाव त्याने काढले
"चोवीस वर्षाचा असे हो बाळ" ती आई रडे
बाबांसही ना आवरे रडणे जशी पत्नी रडे
"तो एकटा आहे अम्हाला, काय आम्ही ना कुणी?"
पत्नीस ये भोवळ, बिचारी जागच्याजागी पडे
पण शेवटी राजू निघाला कारगिल सीमेवरी
सोडून जाई आइबापांना तसे रडते घरी
ओवाळते पत्नी जशी ते हुंदक्यांवर हुंदके
"येईन" राजू बोलला 'जिंकून मी सीमेवरी"
गल्ली निघाली पोचवाया, गावचे रस्ते भरी
ओवाळिती राजूस सारे, घोषणा रस्त्यांवरी
गाडी जशी राजूस घेउन चालली सीमेकडे
गावातले सारे कुटुंबाच्या मनांना सावरी
सीमेवरी सेना किती, त्याच्यात तोही पोचला
शत्रू हुशारीने कितीसा आतवरती पोचला
चाले धुमश्चक्री तिथे, तोफा नव्या, अस्त्रे नवी
होता कुणी अपुल्यात आत्ता, म्रुत्यूद्वारी पोचला
रोजी कुणी येई नवा सेनेत भरती व्हायला
रोजी कुणी संपे जुना स्वर्गात भरती व्हायला
रोजी जराशी हिंदवी सेना पुढे सरकायची
रोजी कुणाची बातमी समजायची, दुखवायला
थंडी तिथे, ना खायला धड, बोंब पाण्याची तिथे
जखमा शरीरावर तरी उम्मेद लढण्याची तिथे ( उमेद )
वरतून शत्रू बरसणे, खालून सेना आपली
संधी मिळावी एकदा सर्वांस जाण्याची तिथे
आयुष्य जे जगता इथे ती देणगी त्यांची असे
घेता सुखाचा श्वास जो ती देणगी त्यांची असे
या दौलती, नेतेगिरी, हे भोग, सारी भांडणे
स्वातंत्र्य हे, हे चोचले ही देणगी त्यांची असे
"रात्री जरा आराम घेऊ, भोजने झाल्यावरी"
हे बोलतो राजूस तो उरतो न जिंदा तोवरी
जो हात देतो चढण चढण्या आज राजूला इथे
हाताविना लढतो उद्याला, पण न तो जातो घरी
राजूस ऑर्डर लाभते "व्हा वेगळे चौघे तुम्ही
त्या बाजुने गोटात शत्रुच्या शिरा चौघे तुम्ही
भेदा रहस्ये, भेदुनी आम्हा मिळा येऊनसे
तुमच्यात ती क्षमता असे, जिंकालरे चौघे तुम्ही"
आनंदले चौघे तसे की काम मोठे लाभले
धीरात त्या बाजूस त्यांनी पाय त्यांचे टाकले
ते पोचले गोटात शत्रूच्या, मिळाली माहिती
ती माहिती घेऊन चौघे यायलाही लागले
नेते करी चर्चा, लढाई चालते सीमेवरी
रक्तात भूमी नाहते, दारूमधे जनता घरी
घेतोच नमते शेवटी युद्धात पाकिस्तान तो
निघतात येथे वीर जेव्हा संकटे देशावरी
ती जिंकल्याची बातमी ऐकायला आली तिथे
ती शूर हृदये चारही बेभानशी झाली तिथे
पण ते सुदैवी तेव्हढे नव्हते बिचारे हे खरे
तुकडी गनीमाची समोरी नेमकी आली तिथे
ते त्यातही लढले खरे पण पकडले गेलेच ते
एका जवळच्या छावणीवर पकडुनी नेलेच ते
बांधून त्यांना ठेवले चोवीस तासांच्यावरी
त्यांना बघाया दुष्मनाचे लोकही जमलेच ते
पुसले कसे आलात, होती काय नक्की योजना?
सांगा कसे झालात जेते, काय तुमची योजना?
सांगा रहस्ये भारताची रक्षणाची सर्व ती
ही माहिती होती कशाला, काय तुमची योजना
चोवीस तासांचे उपाशी, बोलले नाहीत पण
वरती गजांचे मार साही, बोलले नाहीत पण
त्यांना दिले चटके, त्वचा सोलून त्यांची काढली
सारी नखेही उपसली, ते बोलले नाहीत पण
किंचाळले, ते विव्हळले, त्या वेदनांना झेलता
'आई' म्हणाले, होत पश्चात्ताप जखमा झेलता
पण एकही ना बातमी सांगीतली शत्रूस त्या
ते अर्धमेले जाहले साऱ्या छळांना झेलता
जल्लोष होता चालला देशात लोकांचा किती
पेढे कुणी वाटायचे, नाचायचे कोणी किती
नेते प्रशंसा करत होते सैनिकांची आपल्या
जल्लोष सैनिकांतही संचारला होता किती
तुकडीस त्या अनुपस्थिती पण जाणवत होती खरी
चौघे कसे ना परतले ही काळजी होती खरी
कोणी म्हणे जाहीर होवो 'ते न आता राहिले'
पण त्यातिथे चौघे शरीराची करी होळी खरी
जाहीर यादी जाहली की हे हुतात्मे जाहले
आई मराया टेकली, बाबा मनाने संपले
पत्नी पडे फोडून हंबरडा घरी दारामधे
गल्लीतले सारे घराच्या सांत्वनाला धावले
पण ते न होते संपले ना वेदनाही संपल्या
आक्रोश त्यांचा पाहुनी त्या छावण्याही कापल्या
संपायला आले अता ते रक्त शूरांचे तिथे
पण बातम्या सांगीतल्या नाहीत त्यांनी आपल्या
मग कान त्यांचे कापले अन नाक त्यांचे कापले
डोळ्यात दाभण घालुनी डोळेच त्यांचे फोडले
आता न होता जोरही किंचाळण्याचा राहिला
हे शौर्य त्यांचे मानुनी ते आणखी चवताळले
मग लिंग त्यांचे कापल्यावर एक किंचाळी उठे
माणूसकीवर राक्षसांची छापशी काळी उठे
त्या वेदनांनी संपले होते तसे चौघे खरे
आठी तरीही संशयाची राक्षसा भाळी उठे
मग जाळले ते देह तेव्हा शांत सारे जाहले
प्रेते जशी देशात आली लोक सारे कापले
ती बातमी ऐकून घरचे एवढे आक्रंदले
ते प्रेत जेव्हा पोचले सारे मनाने संपले
त्या देणग्या, पदके अता, ते जिंकलेले युद्धही
ते शौर्य चौघांचे पुऱ्या देशात झाले सिद्धही
पण या प्रकाराचे कुणी ना काढले उट्टे कधी
जे पाहुनी चवताळला असता अहिंसक बुद्धही
या किंमती देऊन आले आपले स्वातंत्र्य हो
कोणी अमानुष साहुनी छळ लाभले स्वातंत्र्य हो
दिवसात एखादा तरी क्षण आठवू शूरांस त्या
तेव्हाच भोगू मुफ्त आपण आपले स्वातंत्र्य हो!
हे सत्य घडलेले आहे. बरीच वर्षे मनात होते. आज उतरवले, पण तरीही मुक्त
झाल्यासारखे वाटत नाही. लेखा च्या दर्जात कमतरता किंवा कृत्रिमता भासल्यास माफ कराः
- इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा