फक्त हवे

337/365: The Big MoneyImage by DavidDMuir via Flickrहे हवे
ते हवे
जे ते हवेच हवे !
परवडण्याची चिंता नको
बँक बॅलन्स तपासायला नको
नको हा शब्दच नको
सारे काही फक्त हवे !

विकत हवे
फुकट हवे
कर्जाऊ नाहीतर
हप्त्यांनी हवे !
असे सगळे मिळवायला
अन गलेलठ्ठ पगार हवे !
मिळवायला ते अन जाण्यासाठी
वाहन गारेगार हवे !

लक्झुरियस फ्लॅट हवे ..
सुपर्-फ्लॅट टी व्ही वर चमचम करते
रुपडे हवे !
रात्री कुशीत
आसक्तीने माखलेले एक चामडे हवे !

शेअर्स हवे डिबेन्चर्स हवे
मॉल हवे
मोबाईल चे कॉल हवे !
देव दर्शनात पुढचे स्थान हवे ..
सौना मध्ये स्नान हवे !

एकन्दरीत जीवनातले एकूण एक हवेच हवे !
भोग हवे .. संभोग हवे !
दुसर्‍याला लाभते, मिळते
किंवा नुसते वाटते हवे
ते ते सारे मिळायलाच हवे !
दुसर्‍याकडचे सारे हवे !
दुसर्‍याकडचे नसलेलेही हवे !

असेच जगायला हवे !
आणि जायची वेळ येता,
मोठ्ठे मोठ्ठे रोग हवे !
बड्या एखाद्या हॉस्पिटलाचे अंथरूण ऊबदार हवे !
नाही तर .. अलीशान वृद्धाश्रमाचे पांघरूण हवे !

ज्याला त्याला हेच हवे !
हार्ट चे दुखणे हवे
साखरेचे खुपणे हवे
ब्लड्-प्रेशर चे टुमणे तरी हवे !
मोठेपणाचे मिरवायला ..
एक तरी बिरूद हवे !

त्याला हवे मग मलाही हवे !
एकासारखे दुसरे हवे !
कारण मला हवे तेच त्याला असणार हवे !
शक्यतो त्याच्या आधी हवे ..
नाहीच तर त्याच्या नंतर हवे !

नको इतके - हवे हवे !
हे हवे
ते हवे
जे ते हवे हवे !
जे ते हवेच हवे !


................... प्रदीप वैद्य.

(मित्रवर्य विनय हर्डिकरांच्या षष्ट्यब्दीनिमित्त पुण्यात नुकत्याच झालेल्या परिसंवादात श्री रावसाहेब कसबे यांच्या भाषणात Mass Society ही कल्पना आणि आपण एक समाज म्हणून त्यात कसे जात आहोत हे ऐकल्यावर आणि पटल्यावर सुचलेले काही ...)




ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा