मी, मैत्रीण आणि प्लॅटफॉर्म

Mumbai localImage by induviduality

लिंकरोडच्या पल्याड आहे तिचं घर
तशी घरं आहेत अनेक; पण तिचं विशेष!
मी इकडे दूर फार पूर्वेला
सोबतीला माझ्या हिरवाई आणि डोंगर दर्‍या.

तिच्या घराजवळ समुद्र अथांग
जसं तिचं मन अन् डोळ्यांचा न थांग.
भेटते मला कधीतरी शेवटच्या प्लॅटफॉर्मवर
शांतपणे बसून हातात हात घेऊन

बोलत राहते उगाच नसत्या विषयांवर.
माझ्या डोळ्यांतल्या भावना
तिला कळत नाहीत असं नाही
पण लोकलच्या धडधडाटात
आयुष्य किती वेगानं निघून जातं नाही?

ती पश्चिमेला, मी पूर्वेला,
जोडणारा आम्हाला सूर्य
तो सकाळी सकाळी भाजवतो मला
संध्याकाळी तिच्या केसात खेळत बसतो.

नवल वाटतं त्याचं
कसं जमतं याला?
त्या सुगंधात गुंतून
सहीसलामत बाहेर यायला

मग कधीतरी लोकलच्या दारातच ती उभी राहील,
पुढच्या स्टेशनची वाट बघत.
लोकल भरधाव पळत असेल
स्टेशनांना मागे टाकत.

डोळे पाणावतील तिचे
माझं स्टेशन मागे टाकल्यावर;
जिथे भेटायचो आम्ही शेवटच्या प्लॅटफॉर्मवर
तिथे परत भेटेल मला माझी लोकल गेल्यावर…


ही कविता एका मुंबईकराची आहे. एका पश्चिम रेल्वेवर रहाणार्‍या मुंबईकराची आहे. विशेषतः अंधेरी ते मालाड या पट्ट्यात रहाणार्‍या पश्चिम रेल्वेवरच्या एका मुंबईकराची आहे. प्रेम ही जागतिक भावना असल्याने इतरांनाही भावेल. पण खात्रीनं, वरील मर्यादांमध्ये जवळची किंवा आपली वाटेल. कदाचित ह्या मर्यादांमुळेच इतके दिवस ही कविता इथे टाकण्याचा मूड लागला नसेल...

- मुन्ना बागुल
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या