असं असतं का प्रेम?

Therapeutic Art from 2001Image by MetalRiot via Flickr

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.


""आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?''

""नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.''

""हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?''

""हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.''

""अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील...?''

""नाही डॉक्‍टर. तिला "अल्झायमर्स' झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, ""आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?''

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, ""डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.''

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, ""हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं - त्या गृहस्थांसारखं.''

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-

""चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.''

यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं....

खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?...
इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा