Image via Wikipedia
तुम्ही घरात शिरता तेंव्हासारं शांत शांत असतं
चपला जागेवर, पेपर टिपॉयवर
सारं जागच्या जागी असतं
सोफ्यावरती बसून राहून
हातामधे रिमोट घेऊन
बायको नावाचं वादळ
तुमची वाट बघत बसलं असतं!
तुम्ही खुर्चीवर बसता क्षणी
हातात चहाचा कप येतो
'दमलो बुवा' या वाक्याला
पलिकडुन नुसता हुंकार येतो
टी व्ही मधल्या शून्यात बघत
चहा संपायची वाट बघत
बायको नावाचं वादळ अजून
वादळापूर्वीच्या शांततेत असतं
'आज काय चुकलं आपलं
काय आपला झाला गुन्हा
कालच्या कोणत्या चुकांपैकी
चूक आपण केली पुन्हा?'
विचार तुम्ही करत रहाता
प्रश्नात तुम्ही पडत रहाता
बायको नावाचं वादळ एव्हाना
घोंघावण्याच्या तयारीत असतं
बघता बघता वादळाचे
डोळे आता भरू लागतात
बघता बघता वादळामधून
शब्द आता झरू लागतात
ऐकून तुम्ही घेता सारं
ओसरू देता वेडं वारं
बायको नावाचं वादळ आता
शांत व्हायच्या मार्गावर असतं
तुमचं चुकलं नसलं तरी
तुम्ही 'सॉरी' म्हणून टाकता
तुम्हाला लागलं नसलं तरी
तुम्ही आपलं कण्हून टाकता
वादळ वारं आपलंच असतं
सारं.. सारं... आपलंच असतं
बायको नावाचं वादळ एव्हाना
कोसळून दमून गेलं असतं
कोसळून जाऊन तुमच्याकडे
हळुच बघतं वादळ
तुमच्याकडे अपेक्षेनं बघत
हळुच हसतं वादळ
तुम्ही सारं विसरून जाता
क्षणात हात पसरून जाता
बायको नावाचं वादळ आता
तुमच्या मिठीत शिरलं असतं!
--- प्रसाद शिरगांवकर
khip mast aahe, if posi. give me ur id.
उत्तर द्याहटवा