अंधारात कसा चढणार डोंगर?

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती?



जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.

शेतकरी म्हणाला, ‘‘राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.’’

म्हातारा हसला. म्हणाला, ‘‘अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?’’ ‘‘एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त
दिसतंय याच्या प्रकाशात.’’ तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.’’

म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

आजचा संकल्प : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

टिप्पण्या

  1. kharach hya jivanat THAMBALA TO SAMPALA.SANKATANANA SAMORE JAVUNACH YASHACHA MARG GATHAYACHA
    ASATO.HECH YASHSVI JIVANACHE SUTRA
    AAHE .
    THANKS SANTOSH LAXMAN PAWALE.

    उत्तर द्याहटवा
  2. kharach hya jivanat THAMBALA TO SAMPALA.SANKATANANA SAMORE JAVUNACH YASHACHA MARG GATHAYACHA
    ASATO.HECH YASHSVI JIVANACHE SUTRA
    AAHE .
    THANKS SANTOSH LAXMAN PAWALE.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा