आयुष्याची पहाट... [The Rising - Marathi Poem - Kavita]

Straight On till Morning album coverImage via Wikipediaअंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली...


सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले

उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली

मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती

दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते

याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
"होते" आणि "आहे" यामध्येच
गरुडझेप आठवत आहे

...............................संदिप उभळ्कर
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा