जस्सं च्या तस्सं ...!


जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?
हाक नुसती एकुन थांबेल का वारं?

धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे ?
रिजल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न - काय हे ?
सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप,
आजीबरोबर लावलेलं पहिलंवहिलं रोप

ती दीड रुपया भाड्याची सायकल
ब्रेकडान्स व मुनवौक करणारा तो मायकल
खांद्यावर दिसेल का ती आदिदासची बॅग ?
अन मानेला रुतेल का तो नव्या शर्टाचा टॅग ?

आवडती छत्री हरवेल का परत ?
मोडतील का बेत आल्यावर ठरत ?
शाळेतील मैत्रीण मारेल का परत हाक ?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?

ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट ?
ऑउट झालो कारण चांगली नव्हती बॅट ?
होईल का ब्लॅक अन व्हाईटचा कलर ?
पाहिल्यावर एकदम चोरेल का ती नजर ?

आईस्क्रीमची ती टिंग-टिंग ऐकुन पळतील का पोरं ?
शेंगदाणेवाल्याकडे मिळतील का बोरं ?
जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?
हाक नुसती ऐकुन थांबेल का वारं ?

.......................!!

पण जस्सं च्या तस्स काही राहत नाही
थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटतं
की आई जवळ हवी होती
अन दरवाज्यातल्या मोटारीपेक्षा वाटतं
की जुनी सायकलच बरी होती

आदिदास असो वा रामदास असो, आजीच्या हातच्या लोणच्यापुढं
सारं काही दास आहे
त्यांचीच आठवण येऊन आज
मन मात्र उदास आहे
आठवणींच्या ह्या सावल्यांकडे मी आजकाल पहात नाही
थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

पुर्वी छत्री हरवली होते, आता छत्रही हरवलं आहे
प्रेयसीला लिहिलेलं पहिलंवहिलं पत्रही हरवलं आहे
पावसाच्या प्रत्यक थेंबाप्रमाणे
तिची छबी नवी होती
नजर चुकवण्यासाठी का होईना
पण ती जवळ हवी होती
एरवी मुसळधार पावसातही चिंब भिजणारा मी
आजकाल पावसाच्या वाटेलाही जात नाही
थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

काळ बदलला.. वेळ बदलली.. देश बदलला... वेष बदलला
नाती बदलली .. माती बदलली .. तरीसुद्धा ... तरीसुद्धा ..
मन काही प्रवाहाबरोबर वाहत नाही ...
खरंच .... थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

.................. एक अनामिक कवी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा