मी मराठी

माझं हिंदी [My Hindi - Marathi Lekh]

Fedra Sans Bold (Devanagari script, Hindi lang...
Fedra Sans Bold (Devanagari script, Hindi language) (Photo credit: pixelfrenzy)
मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..
शाळेत विषयच नव्हता..यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…
म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..
मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..
आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..
आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?”
म्हणजे “चहा की कॉफी?” ..

“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…
कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..
मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”
सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..

मग थोड्या दिवसांनी..
“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”
असं…
“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..

मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी
युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..
“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?
पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..”
असंही एक सुंदर गीत होतं..
“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..
‘शान’से हे नंतर कळलं..

पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा
अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..
माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..
“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”
“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..
तो थोडा विचारात पडला..

मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”
हलकेच मला समजावत तो वदला..
दोघेही तिसरीत होतो..असो..
मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..

“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं
ऐकू यायचं..
अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी
आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..

“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू
यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”
”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..
त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..

मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत
असं डोळ्यासमोर यायचं..
“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की आमच्या रत्नागिरीच्या धुवांधार पावसात
भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं
वाटायचं..

गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना
सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की
बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..

नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान
स्तोत्र म्हणायचो..
तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..
खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..
त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..

मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून
सांगताहेत.. म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..

पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..

मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..
मज्जा..!!

- लेखक : गवि

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

३ टिप्पण्या:

Popular Articles

Heart (Photo credit: mozzercork ) नवरदेवाचे उखाणे... १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!! ...
मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]
Image via Wikipedia मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. र...
श्री स्वामी समर्थ [Shree Swami Samarth]
Shri Swami Samartha Maharaj, Akkalkot. (Photo credit: Wikipedia ) श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळा...
Image by mundo resink via Flickr मलाही वाटते नाते असावे मलाही कुणि आपले असावे पण मग एकच गोष्ट माझ्या मनात येते.... आलो असेच आणि जाणारही अ...
पहिला पाऊस .. [The First Rain - Marathi Poem ]
Image via Wikipedia पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं... हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अ...
roses (Photo credit: Robert Couse-Baker ) रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. ...हातात हात धरुन...