होळी - धूळवड - रंगपंचमी: शुभेच्छा!

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणार्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसर्या दिवशी सुरू होणार्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.


लहान मुलांना पीडा देणार्‍या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता.) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव" (धूळवड) आणि "रंगोत्सव" (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.

माहिती: मराठी विकि

टिप्पण्या